Tuesday, February 10, 2026

हया वेब सीरिजवर तत्काळ कारवाईची मागणी

शंकर मराठे - मुंबई, १० फेब्रुवारी २०२६ : सध्या 'देवखेळ' ही वेब सीरिज  मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या सीरिजमधील काही दृश्यांमुळे आणि कथानकामुळे कोकणवासीयांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचा आरोप होत आहे. विशेषतः कोकणातील अत्यंत लोकप्रिय असलेल्या 'नमन-खेळे' या पारंपरिक लोककलेचे चुकीच्या पद्धतीने सादरीकरण करण्यात आले असून, यातील 'शंकासूर' या महत्त्वाच्या लोकदैवताला खुनी म्हणून रंगवण्यात आल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

या आक्षेपाची दखल घेत, या वेब सीरिजवर बंदी घालण्याची मागणी सुरुवातीला आमदार भास्कर जाधव यांनी राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्याकडे केली होती. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून आता आशिष शेलार यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून कठोर कारवाईची विनंती केली आहे.

मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात आशिष शेलार यांनी नमूद केले आहे की, 'झी ५' या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेल्या या सीरिजमध्ये रत्नागिरी जिल्ह्याची ओळख असलेल्या पौराणिक लोककलेचे विद्रूपीकरण झाले आहे. शंकासुरासारख्या पात्राचा झालेला अवमान स्थानिक नागरिकांना मान्य नसून, विविध कलाकार संघटनांनी याला तीव्र विरोध दर्शवला आहे. ही लोककला केवळ मनोरंजनाचे साधन नसून ती कोकणातील ग्रामदैवतांशी जोडलेली आहे आणि तिला मोठे धार्मिक तसेच सामाजिक महत्त्व आहे. राज्य सरकारकडूनही या कलेच्या जतनासाठी सातत्याने प्रयत्न केले जातात. सरकारतर्फे नमन कला महोत्सवाचे आयोजन केले जाते आणि वृद्ध कलावंतांना मानधन देऊन त्यांचा सन्मानही केला जातो.

सध्या कोकणात शिमगोत्सवाची तयारी सुरू असताना आणि सण जवळ आला असताना, अशा प्रकारच्या वादग्रस्त वेब सीरिजमुळे सामाजिक वातावरण दूषित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. लोकांचा वाढता रोष पाहता, या जुन्या लोकपरंपरेला धक्का लागू नये यासाठी सरकारने यात तातडीने लक्ष घालावे. तसेच या प्रकरणाची दखल घेऊन लवकरात लवकर योग्य व उचित कारवाई करण्यात यावी, अशी आग्रही मागणी आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

No comments:

Post a Comment

स्वामीचा "देऊळ बंद २" मध्ये दुचाकीवरून प्रवास

शंकर मराठे - मुंबई, १६ एप्रिल २०२६ : बहुप्रतिक्षित "देऊळ बंद २" च्या प्रदर्शनाची २१ मे २०२६ ही तारीख गेल्या आठवड्यात जाहीर करण्यात...