शंकर मराठे - मुंबई, २६ फेब्रुवारी २०२६ : झी मराठी चैनल वरील अत्यंत लोकप्रिय व थरारक मालिका "देवमाणूस - मधला अध्याय'' सध्या एका अतिशय रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. या मालिकेतील प्रत्येक भाग प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारा ठरत असून, लवकरच मालिकेत एक मोठा धमाका होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. मुख्य पात्र असलेला गोपाळ,
आपल्या गुंतागुंतीच्या कृत्यांनी सर्वांना चकवा देण्यात माहीर आहे, तो आता एका नव्या संकटात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मालिकेच्या आगामी भागांमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे की, गोपाळने स्वतःची खरी ओळख लपवण्यासाठी चक्क 'जोकर'चा अवतार धारण केला आहे. या जोकरच्या रूपा मागे तो आपली गुपिते दडवण्याचा प्रयत्न करत असला, तरी लालीच्या नजरेतून वाचणे त्याला कठीण जाणार असल्याचे दिसत आहे. लाली ही सुरुवातीपासूनच सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत असून, तिला या जोकरच्या वागण्यावर आणि हालचालींवर दाट संशय आला आहे.
या थरारक वळणात, लाली आणि जोकरच्या वेशातील गोपाळ हे एकमेकांच्या समोरासमोर येणार आहेत. गोपाळने आतापर्यंत अनेकदा लोकांच्या डोळ्यात धूळ फेकून स्वतःचा बचाव केला आहे. मात्र, लाली ज्या जिद्दीने या प्रकरणाचा पाठपुरावा करत आहे, ते पाहता या भेटीत गोपाळचे पितळ उघडे पडणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या भेटीमुळे कथानकात मोठे फेरबदल होण्याची शक्यता असून, अनेक दिवसांपासून गुलदस्त्यात असलेल्या काही गोष्टींचा उलगडा होऊ शकतो.
गोपाळने आजवर केलेल्या चुकीच्या कृत्यांचा आणि इतरांच्या आयुष्याशी खेळण्याच्या वृत्तीचा शेवट जवळ आला आहे की तो पुन्हा एकदा एखादी नवी चाल रचून यातून सही सलामत बाहेर पडणार, हे पाहणे रंजक ठरेल. या दोन पात्रां मधील समोरासमोर येणारा हा प्रसंग प्रेक्षकांसाठी प्रचंड उत्सुकतेचा ठरणार असून मालिकेची लोकप्रियता यामुळे अधिकच वाढण्याची चिन्हे आहेत.

No comments:
Post a Comment