शंकर मराठे - मुंबई, ८ फेब्रुवारी २०२६ : झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'वीण दोघांतली ही तुटेना' सध्या अतिशय रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. या मालिकेत दररोज घडणाऱ्या नवीन घडामोडींनी प्रेक्षकांची उत्कंठा वाढवली आहे. आता मालिकेत एक मोठा ट्विस्ट आला असून, मंदाकिनीने थेट राजवाडे कुटुंबासमोर मल्लिकाचा खरा चेहरा उघड करण्याचा निर्णय घेतला आहे.
नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये मंदाकिनी आणि मल्लिका यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचल्याचे दिसत आहे. मल्लिकाने मंदाकिनीचा वापर करून रोहन आणि अधिरा यांच्या सुखी संसारात विष कालवण्याचा डाव रचला होता. त्यासाठी तिने मंदाकिनीला पैशांचे आमिषही दाखवले होते. मल्लिकाच्या सांगण्यावरूनच मंदाकिनीने रोहनला घटस्फोटाची नोटीस पाठवली, ज्यामुळे अधिराला मोठा मानसिक धक्का बसला आणि तिने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला. या सर्व प्रकारानंतर स्वानंदीच्या वडिलांना संशय आल्यावर मंदाकिनीने आपला गुन्हा कबूल केला होता.
आता या कथेने वेगळे वळण घेतले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये मंदाकिनी थेट राजवाडे यांच्या घरी पोहोचली आहे. तिला पाहताच मल्लिकाने नेहमीप्रमाणे साळसूदपणाचा आव आणत, "काय झालं मंदा ताई?" असा प्रश्न विचारला. यावर मंदाकिनीने आक्रमक पवित्रा घेत मल्लिकालाच प्रतिप्रश्न केला.
मंदाकिनीने समरसमोर मोठा खुलासा करत सांगितले की, "रोहन आणि अधिराचे लग्न मोडण्याचा सगळा कट या बाईचाच होता. घटस्फोटाचे पेपर्स पाठवण्याचे कारस्थानही यांनीच रचले आणि त्यासाठी मला पैसे पुरवले." मंदाकिनीचा हा आरोप ऐकून घरात एकच खळबळ उडाली. मात्र, समरला यावर विश्वास बसणे कठीण झाले आहे. त्याने मंदाकिनीला सुनावत म्हटले की, "तुम्ही आधी तुमचा स्वतःचा भूतकाळ तपासून पाहा. माझी काकू माझ्यासाठी आईच्या जागी आहे."
समरचा हा अविश्वास पाहून मंदाकिनीने हार मानली नाही. तिने मल्लिकाविरोधातील ठोस पुरावाच समरसमोर सादर केला आहे. त्यामुळे आता या पुराव्यामुळे समरला आपल्या लाडक्या काकूचे खरे रूप दिसणार का? मल्लिकाच्या कारस्थानांचा पर्दाफाश होणार का? हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरणार आहे.

No comments:
Post a Comment