शंकर मराठे - मुंबई, ८ मार्च २०२६ : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री श्रद्धा कपूरने नुकताच तिचा ३९ वा वाढदिवस साजरा केला असून या वयातही तिचे सौंदर्य आणि फिटनेस एखाद्या २५ वर्षीय तरुणीला लाजवेल असेच आहे. तिच्या या चिरतरुण सौंदर्यामागील रहस्य नेमके काय आहे, याबाबत चाहत्यांमध्ये नेहमीच उत्सुकता असते. एका इंटरव्ह्यू दरम्यान श्रद्धाने तिच्या दैनंदिन आहार, व्यायाम आणि स्किन केअर रूटीनबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.
श्रद्धाच्या फिट राहण्यामागे तिचा शिस्तबद्ध आहार अत्यंत महत्त्वाचा ठरतो. ती प्रामुख्याने घरगुती भारतीय जेवणालाच पसंती देते. तिच्या रोजच्या जेवणात डाळ, भात, पोळी आणि विविध पालेभाज्यांचा समावेश असतो. नाश्त्यामध्ये ती साबुदाणा खिचडी, पोहे, उपमा किंवा मसाला डोसा यांसारख्या पारंपरिक पदार्थांचा आस्वाद घेते. विशेष म्हणजे, रात्रीचे जेवण ती संध्याकाळी ६ ते ७ च्या दरम्यान उरकून घेते. त्यानंतर तिला भूक लागलीच तर ती केवळ सूप पिणे पसंत करते. आहाराबाबत पथ्य पाळताना ती प्रोसेस्ड फूड आणि तळलेले पदार्थ पूर्णपणे टाळते, तर मधल्या वेळेत भूक लागल्यास सुका मेवा खाण्याला प्राधान्य देते.
व्यायामाबाबत बोलताना श्रद्धाने सांगितले की, ती तिच्या ऊर्जेनुसार व्यायामाची वेळ ठरवते. सहसा ती संध्याकाळी ७ च्या सुमारास वर्कआउट करते. केवळ शरीरच नव्हे तर त्वचा तजेलदार ठेवण्यासाठीही ती विशेष काळजी घेते. भरपूर पाणी पिणे आणि पुरेशी झोप घेणे हे तिच्या स्किन केअरचे मुख्य आधारस्तंभ आहेत. बाह्य उपचारांपेक्षाही मनातून आनंदी राहणे हे सौंदर्यासाठी सर्वात जास्त प्रभावी असल्याचे तिचे मत आहे. सध्या श्रद्धा तिच्या आगामी 'विठा' या चित्रपटामुळे चर्चेत असून यामध्ये ती तमाशा कलावंत विठाबाई नारायणगावकर यांची भूमिका साकारताना दिसणार आहे.


No comments:
Post a Comment