शंकर मराठे - मुंबई, १३ नोव्हेंबर २०२५ : मराठी चित्रपटसृष्टीत रहस्य आणि थराराचा नवा अध्याय लिहिणारा ‘असंभव’ सध्या चांगलाच चर्चेत आहे. सचित पाटील दिग्दर्शित या चित्रपटाचा थरारक ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. नैनितालच्या निसर्गरम्य वातावरणात घडणाऱ्या या गूढ कथानकाच्या ट्रेलरने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. ट्रेलरच्या पहिल्याच फ्रेमपासून प्रेक्षक एका गूढ आणि विलक्षण जगात प्रवेश करतात. नैनितालच्या निसर्गरम्य दऱ्याखोऱ्यांमध्ये, शुभ्र धुक्याच्या सान्निध्यात आणि गूढ हवेलीच्या वातावरणात घडणारी ही कथा भूतकाळ आणि वर्तमानकाळाच्या संगमातून आकार घेत असल्याचे दिसतेय. हवेलीतील अघटित घटना, शांततेत दडलेली भीती आणि प्रत्येक पात्राच्या मनात दडलेलं रहस्य हे सगळं ट्रेलरच्या दृश्यरचनेतून काहीतरी असामान्य घडणार असल्याची जाणीव देते.
अभिनेत्री मुक्ता बर्वेच्या नजरेतील भीती व प्रश्न, प्रिया बापटचे गूढ वर्तन, सचित पाटीलचा उत्तरांच्या शोधात असलेला प्रवास आणि संदीप कुलकर्णी यांचा या सगळ्याशी असलेला संबंध हे सर्वच प्रेक्षकांच्या अंगावर काटा आणणारे असून प्रत्येक पात्र काहीतरी लपवतंय आणि ते उलगडताना संपूर्ण चित्र बदलतंय, असा एक विलक्षण अनुभव हा ट्रेलर देतो.
‘असंभव’ ह्या सिनेमात मराठीतील ४ गुणी कलाकार सचित पाटील, मुक्ता बर्वे, प्रिया बापट व संदीप कुलकर्णी पहिल्यांदाच या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र पडद्यावर झळकणार आहेत. रहस्य, भावना आणि नात्यांच्या गुंफलेल्या कथेतून उलगडणारा हा थरारक सिनेमा २१ नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.



No comments:
Post a Comment