शंकर मराठे - मुंबई, २७ मार्च २०२६ : सध्या मध्य पूर्वेत सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतेच एक महत्त्वपूर्ण विधान केले होते. "आपण इराणी लोकांशी चर्चा करण्यास उत्सुक आहोत," असे ट्रम्प म्हणाले होते. मात्र, त्यांच्या या गंभीर राजकीय वक्तव्याचा बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते बोमन इराणी यांनी आपल्या खास शैलीत एक व्हिडिओ सोशल नेटवर्किंग साइट वर पोस्ट केला आहे.
या व्हायरल व्हिडिओमध्ये बोमन इराणी म्हणतात, "सध्या अशी चर्चा सुरू आहे की ट्रम्प साहेबांना इराणी लोकांशी बोलायचे आहे. यासाठी तीन लोकांची निवड झाल्याचे मला समजतेय — स्मृती इराणी जी, अरुणा इराणी जी आणि मी स्वतः, बोमन इराणी. जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी आम्ही काहीही करायला तयार आहोत."
यापुढे जात बोमन इराणी यांनी एक भन्नाट अट ठेवली आहे. ते म्हणतात, "माझी एकच अट आहे, मी काही वॉशिंग्टनला येणार नाही. त्याऐवजी ट्रम्प साहेबांनी त्यांच्या शिष्टमंडळासह मुंबईच्या दादर पारसी कॉलनीमध्ये यावे. आम्ही त्यांना छान धन्साक आणि कस्टर्ड खायला घालू." तसेच, देशातील सध्याच्या एलपीजी दरवाढीवर आणि गॅस तुटवड्यावर अप्रत्यक्ष टोला लगावत ते पुढे म्हणाले, "हो, पण येताना त्यांनी सोबत एक मोठा गॅस सिलेंडर नक्की घेऊन यावा, म्हणजे आमचे काम सोपे होईल आणि सगळे काही सुरळीत पार पडेल!"

No comments:
Post a Comment