शंकर मराठे - मुंबई, ११ मे २०२६ : प्रसिद्ध अभिनेते मोहन जोशी यांनी त्यांच्या आगामी 'देऊळबंद २' या चित्रपटाच्या निमित्ताने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी सांगितले की, हा चित्रपट त्यांनी मनापासून केला असून सर्व कलाकारांनी यासाठी खूप कष्ट घेतले आहेत.
आपल्या कामातील ऊर्जेबद्दल बोलताना जोशी यांनी सांगितले की, ते पहिल्यापासून अत्यंत जिद्दी आहेत. "एखादी गोष्ट करायची ठरवली की ती करायचीच, मग समोरची भिंत तरी तुटेल किंवा डोकं तरी फुटेल" या जिद्दीवर ते आजही ७५ व्या वर्षी काम करत आहेत. चित्रीकरणादरम्यान कधीकधी ३३-३३ तास काम करावे लागते, अशा वेळी थकवा येतो आणि क्रिएटिव्हिटीवर परिणाम होतो, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले.
'देऊळबंद' चित्रपटातील स्वामी समर्थांच्या भूमिकेबाबत एक खास आठवण सांगताना ते म्हणाले की, त्यांनी हिंदी सिनेमात अनेक खलनायकी भूमिका केल्या आहेत, तरीही या भूमिकेनंतर लोक त्यांच्या पाया पडू लागले. सुरुवातीला त्यांना हे खूप विचित्र वाटायचे, पण नंतर आपली भूमिका प्रेक्षकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचली आहे हे लक्षात आल्यावर त्यांना खूप आनंद झाला. आता जेव्हा लोक पाया पडतात, तेव्हा ते आनंदाने त्यांना आशीर्वाद देतात.

No comments:
Post a Comment