Saturday, September 19, 2026

ऑस्करच्या दिशेने "गोंधळ" - नवविवाहितेच्या आयुष्यातील कथा


शंकर मराठे - मुंबई, १९ सप्टेंबर २०२६ : गोंधळ - महाराष्ट्राच्या मातीतील नाद ऑस्करच्या दिशेने

रात्र गडद होत चालली आहे...गावातल्या एखाद्या जुन्या वाड्याच्या अंगणात दिव्यांची  रोषणाई. आजूबाजूला जमलेली माणसं. कुठेतरी दूरवरून ढोलाचा आवाज कानावर येतो. मग टाळांचा नाद. मंत्रोच्चार. गाणं. नृत्य. आणि हळूहळू वाढत जाणारी त्या विधीची लय... ही केवळ पूजा नाही.  ही महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीने शतकानुशतकं जपलेली एक जिवंत परंपरा आहे—गोंधळ!


आता याच गोंधळाचा नाद महाराष्ट्राच्या एखाद्या गावातून थेट जगाच्या सर्वांत प्रतिष्ठेच्या चित्रपट सोहळ्याकडे निघाला आहे.

मराठी चित्रपट ‘गोंधळ’ची २०२७च्या ऑस्करसाठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड झाली आहे. फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने शुक्रवारी ही घोषणा केली. तब्बल ३३ चित्रपटांच्या यादीतून ‘गोंधळ’ची निवड करण्यात आली. निवड समितीचे अध्यक्ष पी. शेषाद्री यांनी ही माहिती दिली.


एका मराठी चित्रपटासाठी ही नक्कीच महत्त्वाची घटना आहे. पण ‘गोंधळ’ची कथा ऐकताना त्याहूनही एक वेगळी गोष्ट जाणवते—महाराष्ट्राच्या पारंपरिक संस्कृतीचा एक ठेका आता जागतिक पडद्यावर ऐकू येण्याची शक्यता आहे.

चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन संतोष डावखर यांचे आहे. कथा ग्रामीण महाराष्ट्रात घडते. ‘गोंधळ’ची कथा  एका रात्रीची आहे.

नवविवाहित सुमन आणि आनंद यांच्या आयुष्यातील एका प्रसंगापासून घटनांची गुंतागुंत सुरू होते.सुमनची भूमिका इशिता देशमुख यांनी साकारली आहे. लग्न झालं आहे; पण लग्नाबरोबर आयुष्यातला आनंद  होत नाही. उलट काही जुने हिशेब पुन्हा समोर येतात. कुटुंबातील दडलेले ताणतणाव आणि एक धोकादायक कट... या सगळ्यामुळे वातावरणात हळूहळू अस्वस्थता निर्माण होते.

आणि या सगळ्याच्या मध्यभागी आहे—गोंधळ. इथेच चित्रपटाची कल्पना वेगळी ठरते.

गोंधळाचा विधी केवळ पार्श्वभूमीवर चालू असलेला कार्यक्रम नाही. दिग्दर्शकाने त्याला कथानकाचा एक सक्रिय भाग बनवलं आहे. गाणं सुरू होतं, ढोल वाजतो, नृत्याची लय वाढते आणि त्याच वेळी पडद्यावरची कथा एका वेगळ्याच दिशेने सरकत जाते. जणू ढोलाचा प्रत्येक ठोका कथेतल्या एखाद्या गुपितावर पडतोय.

गोंधळाची रात्र पुढे सरकते आणि त्याचबरोबर व्यक्तिरेखांच्या मनातला ताणही वाढत जातो. बाहेर विधीचा गोंधळ आहे; आत प्रत्येकाच्या मनात वेगळाच गोंधळ!यामुळे ‘गोंधळ’ हा शब्द चित्रपटाच्या नावापुरता राहत नाही. तो कथेतल्या मानसिक आणि सामाजिक गुंतागुंतीचं रूपकही बनतो.

 ‘गोंधळ’ची कथा ग्रामीण महाराष्ट्राची आहे. पण तिच्या केंद्रस्थानी असलेला प्रश्न केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही. लग्न, कुटुंब, जुने संबंध, संशय, सत्तासंबंध, भीती आणि माणसांच्या मनात दडलेली रहस्यं—ही भाषा जगभरातील प्रेक्षकांना समजू शकते. आणि म्हणूनच कदाचित स्थानिक कथा जागतिक होण्याचा मार्ग इथे दिसतो.

‘गोंधळ’मध्ये किशोर कदम, इशिता देशमुख, योगेश सोहोनी, निषाद भोईर, अनुज प्रभू आणि सुरेश विश्वकर्मा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाची निर्मिती डावखर फिल्म्सची आहे.

आता पुढचा टप्पा अमेरिकेत आहे. १४ मार्च २०२७. रविवार. ९९वा ऑस्कर सोहळा.

हॉलिवूडमध्ये त्या रात्री जगभरातील चित्रपटांची नावं पुकारली जातील. कॅमेरे चमकतील. रेड कार्पेटवर जगभरातील कलाकार दिसतील.

आणि कुठेतरी त्या प्रचंड झगमगाटाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या एखाद्या गावातील रात्रीचा आवाज आठवेल ढोलाचा ठेका...टाळांचा नाद...गाण्याची लय... आणि एका विधीतून उलगडणारी माणसांची कथा.

गोंधळ गावात सुरू झाला असेल; पण आता त्याचा प्रवास ऑस्करपर्यंत पोहोचला आहे.

कधी कधी... एका छोट्याशा गावातला ढोलाचा ठोका हॉलिवूडच्या झगमगाटापेक्षाही दूरवर ऐकू जातो.

No comments:

Post a Comment

कल्पना पटवारी की ७ गीतों की ‘छठ गीतमाला’

शंकर मराठे - मुंबई, ६ नवंबर, २०२६ : छठ महापर्व के अवसर पर लोकगायिका कल्पना पटवारी ७ छठगीतों की विशेष ‘छठ गीतमाला’ लेकर आ रही हैं। इस संगीतमय...