शंकर मराठे - मुंबई, १९ ऑक्टोबर, २०२६ : झी मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या ‘तारिणी’ मालिकेत सध्या एकापेक्षा एक धक्कादायक घडामोडी घडत आहेत. एकीकडे तारिणी आणि केदार सत्याच्या शोधात आहेत, तर दुसरीकडे युवराजच्या वागण्यात वाढलेली चिडचिड आणि अस्वस्थता अनेक प्रश्न निर्माण करत आहे. आता दसऱ्याच्या मुहूर्तावर मालिकेत मोठा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे.
कामत काकांची भेट घेतल्यानंतर युवराज प्रचंड अस्वस्थ झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्याच्या मनातील भीती आणि राग त्याच्या वागण्यातून स्पष्ट दिसत आहेत. रस्त्यावर एका व्यक्तीला मारहाण करण्यापर्यंत त्याचा राग पोहोचतो. त्यामुळे युवराज कोणत्या मोठ्या संकटात अडकला आहे आणि त्यामागे नेमकं कोण आहे, याची उत्सुकता वाढली आहे.
पद्मिनी काकू आणि तारिणी यांच्यातील वादाने वेगळंच वळण घेतलं आहे. पद्मिनी काकूंनी तारिणीचा अपमान करण्याचा प्रयत्न केला, मात्र सुमी वेळीच तिथे पोहोचल्याने परिस्थिती सावरली. ही घटना केदारला समजताच तो संतापतो आणि तारिणीच्या बाजूने खंबीरपणे उभा राहतो.
दुसरीकडे, निशीच्या मागण्या आणि कामत काकांचं नाव ऐकताच युवराजचा संताप अनावर होतो. त्यामुळे त्याच्या मनात नेमकी कोणती भीती आहे, हा प्रश्न अधिकच गडद होत आहे.
आता मालिकेतील सर्वात मोठा ट्विस्ट म्हणजे दसऱ्याच्या दिवशी मंदिरातील मौल्यवान मुकुट चोरीला जाण्याचा कथित कट! या प्रकरणात युवराजचा सहभाग असण्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तारिणी आणि केदारही सावध झाले असून, युवराजला रंगेहात पकडण्यासाठी ते काही खेळी करणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
पण इथेच खरी उत्सुकता आहे! तारिणी युवराजचा डाव उधळून लावणार की युवराज सगळ्यांच्या नजरेत धूळफेक करून मुकुट चोरी करण्यात यशस्वी होणार? आणि या सगळ्यामागचा खरा मास्टरमाइंड कोण असेल?
हे पाहण्यासाठी प्रेक्षकांना आगामी भागाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

No comments:
Post a Comment