Tuesday, October 13, 2026

मराठी रंगभूमीवर OTTच्या धाटणीचा प्रयोग; ‘ति ची गोष्ट’मधून उलगडणार स्त्रीमनाचे भावविश्व!



शंकर मराठे - मुंबई, १३ ऑक्टोबर, २०२६ :  डिजिटल माध्यमांमुळे कथाकथनाची बदललेली शैली आता रंगभूमीवरही अनुभवता येणार आहे. सुप्रसिद्ध लेखक आनंद म्हसवेकर यांच्या तीन स्वतंत्र कथांना एका सूत्रात गुंफत दिग्दर्शक प्रशांत गिरकर यांनी ‘ति ची गोष्ट — Season 1’ हा अभिनव रंगमंचीय प्रयोग साकारला आहे. तीन कथा, वेगवेगळी पात्रे आणि निरनिराळ्या परिस्थितींतून स्त्रीच्या भावविश्वाचा वेध घेणाऱ्या या प्रयोगात मुंबई केवळ कथांची पार्श्वभूमी न राहता निवेदकाच्या भूमिकेतूनही प्रेक्षकांशी संवाद साधते.

OTTवरील मालिकांप्रमाणे एकाच सादरीकरणात वेगवेगळ्या कथांचा अनुभव देण्याची संकल्पना या प्रयोगातून मांडण्यात आली आहे. ‘पाण्यात पाहताना…’, ‘Female V/S Female’ आणि ‘Waiting Room’ या तीन कथांचा त्यात समावेश आहे. कथा आणि व्यक्तिरेखा बदलत असल्या, तरी स्त्रीच्या मनातील भावना, तिचे संघर्ष, इच्छा-आकांक्षा आणि न बोललेल्या गोष्टी हा तिन्ही कथांना जोडणारा समान धागा आहे.

*‘मी मुंबई बोलतेय...’ : मुंबईच बनते सूत्रधार*

मुंबईच्या वेगवान जीवनशैलीत, बदलत्या सामाजिक वास्तवात आणि गुंतागुंतीच्या नातेसंबंधांत जगणाऱ्या स्त्रीच्या अनुभवांचे प्रतिबिंब या नाटकात उमटते. अभिनेत्री उषा नाडकर्णी यांच्या कणखर आवाजातील निवेदनातून ‘मी मुंबई बोलतेय...’ ही संकल्पना साकारते. मुंबईने पाहिलेली माणसे, अनुभवलेले प्रसंग आणि या महानगरात घडणाऱ्या जीवननाट्याची साक्ष या निवेदनातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचते.

स्त्रीकडे केवळ आई, पत्नी, मुलगी, बहीण किंवा प्रेयसी अशा नात्यांतून न पाहता स्वतंत्र विचार आणि भावविश्व असलेली व्यक्ती म्हणून पाहण्याचा प्रयत्न या प्रयोगातून करण्यात आला आहे. तिच्या मनातील द्वंद्व, अपेक्षा आणि न व्यक्त झालेल्या भावनांना रंगमंचावर स्थान मिळते. त्यामुळे प्रेक्षकांना कथांमधील व्यक्तिरेखांमध्ये स्वतःच्या अनुभवांचे प्रतिबिंब दिसते. विशेषतः महिला प्रेक्षकांकडून या प्रयोगाला भावनिक प्रतिसाद मिळत असल्याचे दिग्दर्शक प्रशांत गिरकर यांनी सांगितले. ‘आमच्या मनातलं तुम्ही रंगमंचावर मांडलंत,’ अशा प्रतिक्रिया महिला प्रेक्षकांकडून मिळत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

*अनुभवी आणि नवोदित अभिनेत्रींचा सहभाग*

या प्रयोगात ‘भय्या हात-पाय पसरी’ या नाटकातील भूमिकेमुळे परिचित झालेल्या निर्मला कोटणीस, हिंदी-मराठी चित्रपट आणि नाटकांत काम केलेल्या स्मिता ओक व नीता दोंदे यांच्यासह कर्टन रेझर अकादमी ऑफ फिल्म अँड थिएटरच्या विद्यार्थिनी शुचिका जोशी, उन्नती शिंदे आणि वेदिका वाळींबे या सहा अभिनेत्री विविध भूमिका साकारत आहेत. उषा नाडकर्णी यांच्या निवेदनामुळे कथांना एकत्र बांधणारा धागा अधिक ठळक होतो.

सुनील देवळेकर यांचे नेपथ्य व प्रकाशयोजना आणि संगीतकार कौशल इनामदार यांचे पार्श्वसंगीत या प्रयोगाला पूरक ठरते. बदलणाऱ्या कथांनुसार रंगमंचावर निर्माण होणारे वातावरण आणि संगीताच्या माध्यमातून व्यक्त होणाऱ्या भावछटा हा सादरीकरणातील महत्त्वाचा भाग आहे.

*तीन कथांतून एकाच प्रश्नाचा शोध*

प्रचलित व्यावसायिक नाटकांच्या सादरीकरणापेक्षा वेगळा मार्ग स्वीकारत प्रशांत गिरकर आणि निर्माती नमिता गिरकर यांनी हा प्रयोग उभा केला आहे. स्वतंत्र कथांना एका संकल्पनेशी जोडून रंगमंचीय कथनाची नवी शक्यता तपासण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

मुंबईच्या पार्श्वभूमीवर घडणाऱ्या या तीन कथांमधून स्त्रीच्या आयुष्याकडे, तिच्या भावविश्वाकडे आणि समाजातील नातेसंबंधांकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन समोर येतो. ‘ति ची गोष्ट — Season 1’ या प्रयोगातून मनोरंजनाबरोबरच स्त्रीच्या मनाचा आणि तिच्या न बोललेल्या भावनांचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.


No comments:

Post a Comment

कल्पना पटवारी की ७ गीतों की ‘छठ गीतमाला’

शंकर मराठे - मुंबई, ६ नवंबर, २०२६ : छठ महापर्व के अवसर पर लोकगायिका कल्पना पटवारी ७ छठगीतों की विशेष ‘छठ गीतमाला’ लेकर आ रही हैं। इस संगीतमय...