शंकर मराठे - मुंबई, ६ डिसेंबर २०२५ : रुपेरी पडद्यावर साक्षात 'साईबाबा' उभे केले आणि घराघरात श्रद्धा पोहोचवली, त्या ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांच्या पाठीशी खुद्द शिर्डी साईबाबा संस्थान खंबीरपणे उभे राहिले आहे. सुधीर दळवी सध्या 'सेव्हर सेप्सिस' या गंभीर आजाराचा सामना करत असून त्यांच्या उपचारासाठी शिर्डी संस्थानाने तब्बल ११ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.
सुधीर दळवी हे ऑक्टोबर महिन्यापासून मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार घेत आहेत. आजारपण गंभीर असल्याने आणि रुग्णालयाचा खर्च मोठा असल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी मदतीचे आवाहन केले होते. कुटुंबाने आतापर्यंत १० लाख रुपये खर्च केले आहेत, पण पुढील उपचारासाठी अजून पैशांची गरज होती. ही बाब समजताच शिर्डी संस्थानाने पुढाकार घेतला.
शिर्डी संस्थानाला अशा प्रकारे वैयक्तिक मदत करण्यासाठी नियमानुसार हायकोर्टाच्या परवानगीची गरज असते. अभिनेता सुधीर दळवी यांनी साईबाबांच्या भूमिकेतून जी सेवा केली आहे, तिचा विचार करून कोर्टानेही या मदतीला तातडीने मंजुरी दिली. साईबाबांची भूमिका करणाऱ्या या ज्येष्ठ कलाकाराला साक्षात साईंच्या दरबारातून मदत मिळाल्याने चाहत्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

No comments:
Post a Comment